शुभप्रसंगी भेट देणे ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पूर्वी ती धातू स्वरूपात असे.. जसे की तांब्या-पितळेची भांडी, चांदीच्या वस्तू (उदाहरणार्थ पेला, वाटी, लामण दिवा,छल्ला, चौफुला, हळद कुंकवाचा करंडा, अत्तरदाणी, गुलाबदाणी), तर सोन्यामध्ये (कर्णफुले, हार, चेन, ब्रेसलेट, अंगठी, कडे इत्यादी).. दिवस पुढे जात होते व भेट स्वरूप पण बदलले.. मग आले स्टीलचे डिनर सेट, चांदी-सोन्याची नाणी.. आता चांदी-सोन्याचा दर पाहता हे लुप्त पावत आहे.. आधीच असलेल्या व वापरात नसलेल्या स्टील, क्रोकरीच्या वस्तू या भेट स्वरूपात आलेल्या असूनही वापरल्या जात नाहीत.. उलट त्याचे काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो.
अशावेळी छोट्या व टोकन स्वरूपात भेट म्हणून पाकिटात रोख रक्कम भरून दिली जाते. ती शंभर रुपये, पाचशे रुपये, हजार रुपये अशी नसते तर ती एकशे एक रुपये, पाचशे एक रुपये, एक हजार एक रुपये अशा स्वरूपात असते..आपण कधी याचा विचार केला आहे का, की हा एक रुपया अधिक स्वरूपात भेटीत का समाविष्ट केला जातो...... या मागचा विचार असा आहे..
शून्य हे अंत म्हणजेच शेवट दर्शवते. तर एक अंक 'नवीन सुरुवात' याचे द्योतक आहे. कदाचित भेट प्राप्तकर्त्याला नवीन सुरुवात फलदायी ठरो ही शुभप्रसंगी दिलेल्या भेटीमागील भावना असावी.
१00, ५00, १000 सारख्या संख्या विभाजित होतात.
परंतु १0१, ५0१, १00१ या अविभाज्य राहतात. थोडक्यात आपली भेट स्वरूप रोख ही अविभाज्य रहावी, अखंड राहावी, असाही उद्देश असू शकतो.
भेटी सोबतच्या भावना व आशीर्वाद या कायमस्वरूपी अखंड अविभाजित राहाव्या अशी संकल्पना १0१, ५0१, १00१ अशी रोख भेट देताना मनी असावी.
हाच विचार ज्यावेळी एखादा सार्वजनिक कार्यक्रम असतो व वर्गणी गोळा केली जाते तेव्हाही वापरला जातो. तसेच एखादा धार्मिक विधी करणे असल्यास, त्यावेळी दक्षिणा व खर्च या स्वरूपात १0१, ५0१, १00१ इत्यादी रक्कम ग्राह्य धरण्याची पद्धत आहे.
'एक रुपया हा वर्धित्वाकडे मार्ग दाखवतो,शून्य नाही'
माझी अशी धारणा आहे की हा एक रुपया नाणे स्वरूपातच असावा.. कारण एकतर एक रुपयाची नोट मिळणे दुरापास्त आणि एक रुपयाचे नाणे सहज उपलब्ध. नाणे हे धातूपासून बनलेले असते.. थोडक्यात नाण्याचा संबंध खनिजाशी म्हणजेच निसर्गाशी येतो. नैसर्गिक संपत्ती लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते.. आपली भेटस्वरूप रोखरक्कम शुभाशीर्वाद स्वरूपात अखंड व निसर्गाशी तादात्म्य राखून लक्ष्मीप्रसाद म्हणून ज्याला दिले जाते, त्याच्या भरभराटीस प्रेरक ठरतात असा समाज.
मोठी रक्कम, (१000+) ही इन्व्हेस्टमेंट म्हणून गणली जाईल तर एक रुपया त्या इन्व्हेस्टमेंटचे बीजस्वरूप असेल.
भेट ही शुभेच्छा, आशीर्वाद या स्वरूपात असल्याकारणाने त्यामागे ज्याला ही भेट दिली जाते त्याचा सदैव उत्कर्ष व्हावा ही भावना मनोमनी असते.
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता| नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः॥

खूप सुंदर 👌🏼
ReplyDeleteदत्तात्रय फणसे छान महत्व पूर्ण माहिती 👌
ReplyDeleteछान माहिती मिळाली
ReplyDelete