एखादी व्यक्ती मृत्यूशय्येवर आहे, डॉक्टरांनी सुद्धा आशा सोडली आहे व आता फक्त वाट पाहणे हेच आपल्या हातात आहे असा ज्यावेळी समज करून देण्यात येतो, त्यावेळी मरण सुकर व्हावे व शांततेत क्लेशविरहित प्राण जावेत, ह्यास्तव महामृत्युंजय जप करावा असा समज आहे.
परंतु या मंत्राचा अर्थ व त्यातून प्रकट होणारे भाव पाहता, जडसंकट, दीर्घ आजार, इत्यादीपासून मुक्ती मिळण्यासाठी, आत्मिक बलसंवर्धनासाठी हा जप योग्य ठरतो अशी माझी धारणा झाली आहे. कसे ते पाहूया... बघा पटते का.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
ब्रह्माच्या नाभीकमलातून उत्पन्न झालेला व हृदय,कंठ असा प्रवास करून मुखातून बाहेर पडणारा ॐ हा 'अ, ऊ, म' म्हणजेच ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन तत्त्वांचा एकत्रित भाव आहे. म्हणजे तो श्रेष्ठ तर असणारच (ॐ).
अशा तीन डोळे असणाऱ्या, म्हणजेच भगवान शिवाची आम्ही आराधना करतो (त्र्यम्बकं यजामहे).
असा हा शिव संपूर्ण जगतात आपल्या दिव्य सुवासाने (खरे पाहता कीर्ती व प्रभावाने) व्यापलेला आहे व तो आपल्या सर्व भक्तांचे पोषण व संवर्धन करतो (सुगन्धिं पुष्टिवर्धनम्)
ज्याप्रमाणे एखादे फळ पूर्ण पिकल्यावर वेलीच्या बंधनातून मुक्त होते त्याप्रमाणे आम्हाला संकट व मृत्यूच्या बंधनातून मुक्त कर. परंतु अमरत्वापासून वंचित ठेवू नकोस. थोडक्यात आम्हाला मुक्ती व शांती प्रदान कर. (उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्).
जो कोणी या मंत्राचा जप एकाग्र चित्ताने करील, त्याला आत्मविश्वास प्राप्त होईल. त्यामुळे कुठल्याही संकटातून मार्ग काढण्याचा उपाय सुचेल. हे सारे भगवत कृपेने प्राप्त होईल.
याचा दुसरा फायदा म्हणजे विखारी विचार त्याला स्पर्शही करणार नाहीत. थोडक्यात मन निर्मळ राहील.
१0८ वेळा या मंत्राचा जप करून शिवास जलाभिषेक करावा व तीर्थ प्राशन करावे. त्यावेळी "अकाल मृत्यूहरणं,सर्व व्याधी विनाशनम, शिवपादोदक तीर्थम,जठरे धारयामी अहम" हा मंत्र म्हणावा.

Comments
Post a Comment