विचार माझा... प्रतिक्रिया तुमची


 दान :

असे म्हणतात की दान गुप्त असावे, इतके की उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू नये. दान हे एक प्रकारे तपच आहे. कर्तव्य अथवा समाजसेवा ही स्वार्थविरहित आहे, त्याला विशेष महत्त्व आहे. अन्नदान (उरलेले नव्हे), संपत्तीदान, विद्यादान, वस्त्रदान असे अनेक विविध दान प्रकार आहेत. करणाऱ्याने ते 'सत्पात्री' पडत आहेत याची खातरजमा करूनच दान करावे. फलप्राप्ती अपेक्षित नसावी. आपल्या धर्मात, चातुर्मास, कुंभमेळा हे दानास उत्तम पर्व मानले गेले आहेत. माझ्यामते फलाची आशा बाळगून केलेले दान हे दानच नाही. ते एक प्रकारे जगात मिरवण्यासाठी प्रसिद्धीचे एक साधन म्हणून वापरले जाते. 

लोभ,आसक्ती कमी करण्यासाठी आचरलेले ते एक प्रकारचे तपच आहे.

आवडत्या वस्तूंचा त्याग हे सुद्धा एक प्रकारे दानच आहे. कदाचित, चातुर्मासात काही खाद्यपदार्थांवर निर्बंध घालून मनावर नियंत्रण ठेवण्याची क्रिया ही सुद्धा दान/त्याग प्रकारात मोडते असा माझा समज आहे.


दाढी मिशा:

श्रीविष्णू, श्रीराम व श्रीकृष्ण हे पुरुष देव कधीही दाढी मिशात दाखवले जात नाहीत. पण ब्रह्मदेव मात्र दाढी मिशातच दिसतात. ते प्रजापती आहेत. त्यांना बाल्य, तारुण्य, वृद्धत्व अशा मानवी अवस्था असल्याचा संदर्भ सापडत नाही म्हणूनच कदाचित त्यांना दाढी मिशासह दाखवत असावेत, पण राम, कृष्ण मानव रुपात असूनही त्यांना दाढी मिशा विरहित का दाखवले जाते हे मात्र कोडेच आहे.


यज्ञोपवीत (जानवे):

यात तीन दोऱ्या असतात. हे तीन दोरे ,तीन नाड्या.. इडा, पिंगळा, सुषुम्ना दर्शवतात. या तीन नाड्यांची शक्ती गायत्री मंत्राच्या नित्य पठणाने जानव्यात बद्ध होऊन, सत्व रज व तम या तीन गुणांनी ब्रह्मगाठीत एकवटते अशी धारणा आहे.


घंटानाद:

आपण करीत असलेली देवाची प्रार्थना सर्वदूर पसरावी व त्याचा लाभ समाजास मिळावा हा एक उद्देश असेल. तर घंटानादामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी वातावरणातील कीटकांना आपल्यापासून लांब सारतात जेणेकरून अशा कीटकांपासून शरीराचे संरक्षण होते. आता त्यामुळे ध्वनीप्रदूषण होणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच "घंटा बडवू नका" असे सांगण्यात येते.


नामस्मरण:

भक्ती करण्याचे सर्वात सोपे साधन, जे आपले देवाशी निर्गुण, सगुण या दोन्ही प्रकारांनी जोडले जाते. सहज उपलब्ध, बिनकष्टाचे तसेच बिनखर्चाचे असे प्रभावी साधन आहे. सर्व संत महात्म्यांनी नामस्मरणास अनन्य साधारण महत्व दिले आहे. भागवत धर्मात तर गहिनीनाथांनी भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने "जय जय राम कृष्ण हरी" हा अमोघ मंत्र निर्माण केला... "हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी" हे का म्हटले आहे याचा बोध कदाचित यामुळे होतो. 


मंत्रजप व पथ्य:

नामस्मरणास काळ, वेळ, स्थान यावर बंधन नाही. पण शास्त्र सांगते की मंत्र जप करताना मात्र काही पथ्ये पाळावित.. उदाहरणार्थ.. शुचिर्भूत होऊन, परान्न टाळावे, ब्रह्मचर्य पालन करावे, भाषण मीत असावे, मौनव्रत उत्तम. सात्विक आहार घ्यावा. या साऱ्या बंधनांमुळे शरीरशुद्धी तसेच आत्मशुद्धी होते हे लक्षात येते.


 शांती:

वय वर्षे ५0 ते १00 या कालावधीत दर पाच वर्षांनी शांतीविधी करावा असे प्राचीन ऋषीमुनींनी सांगितले आहे.  

५0 व्या वर्षी वैष्णवशांती,

५५ व्या वर्षी वारुणीशांती, 

साठाव्या वर्षी उग्ररथशांती

६५ व्या वर्षी मृत्युंजयमहारथी शांती

७0 व्या वर्षी भौमरथ शांती

७५ व्या वर्षी ऐंद्रीशांती 

आपण मात्र ६१ पूर्ती, अमृत महोत्सव, सहस्त्रचंद्रदर्शन असे समारंभ घडवून आणतो व आप्तस्वकीयांना एका छत्राखाली जमवतो. त्यात वावगे काहीच नाही...वर सांगितलेले विधी करणारे अधिकारी, ब्रह्मवृंद मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे तूर्तास, केवळ माहिती म्हणूनच त्याकडे पाहूया.


लिहायला असे अनेक विषय आहेत पण वेळेचे बंधन व वाचन रटाळ होऊ नये हे ध्यानात ठेवून आज इथेच आपली रजा घेतो.

Comments

  1. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून मगच लेख लिहितोस. खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे. अशीच माहिती आम्हाला देत जा.

    ReplyDelete

Post a Comment