आज आपण 'AI' च्या युगात वावरत असलो तरीही काही विशिष्ट बाबतीत 'धर्मशास्त्राप्रमाणे' कृती करण्याकडे आपला कल असतो. यातील एक बाब म्हणजे 'अंतेष्टी प्रयोग' अर्थात 'दाह संस्कार'.
मृत्यूची दुःखद वार्ता समजल्यावर अंत्यदर्शन / अंत्यसंस्कारास उपस्थित राहणे आलेच. माझ्या अवलोकनात असे दिसून आले आहे की मृत घरी त्यांचे आप्त-स्वकीय 'वेळ कशी होती' याबाबत कुजबूज करीत असतात. येथेच आजच्या विषयाचा जन्म...'त्रिपाद व पंचक'...
हिंदू धर्मात त्रिपाद नक्षत्र व पंचक या संकल्पनेकडे गांभीर्याने पाहिले जाते.
त्रिपाद नक्षत्राचा ढोबळमानाने परामर्श घेऊया.
सुरुवात पंचांगाचे तिसरे अंग 'नक्षत्र' यापासून होते. सूर्याच्या अंतराळातील वर्तुळाकार भ्रमण मार्गाचे २७ भाग आहेत, असे गृहीत धरून त्यांना नावे दिली गेली. ही नावे म्हणजेच २७ नक्षत्रे. एका नक्षत्रात चंद्राचा मुक्काम किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात तास मिनिट या स्वरूपात दाखविले जाते . इंग्रजी तारीखही दिसते. त्यातून आपल्याला माहिती मिळणे सहज शक्य होते.
उदाहरणार्थ 🠋

प्रत्येक नक्षत्र चार भागात विभागले जाते. त्याला चरण असे म्हणतात. ज्या नक्षत्राचा प्रथम चरण एका राशीत व उर्वरित तीन चरण दुसऱ्या राशीत असतात अशा नक्षत्राला त्रिपाद नक्षत्र असे संबोधतात. ही त्रिपाद नक्षत्रे पुढील प्रमाणे कृतिका, पुनर्वसू, उत्तराफाल्गुनी, विशाखा, उत्तराशाढा व पूर्वाभाद्रपदा.
असा समज (की गैरसमज) आहे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू त्रिपाद नक्षत्रात झाला तर कुटुंबात किंवा जवळच्या संबंधात तीन संकटे किंवा तीन मृत्यूचे सावट असू शकते... ही भीती काही प्रमाणात हरण करण्यासाठी 'शांती' हा मार्ग स्वीकारला जातो. हा विधी पुरोहित स्मशानातच करतात... बहुदा पिठाच्या बाहुल्या करून मंत्रोच्चारासह त्यांचे दहन मृतदेहाबरोबर केले जाते.
आता 'पंचकाविषयी'..
चंद्राचे भ्रमण बारा राशी सतत चालू असते. त्यातील अकराव्या म्हणजे कुंभ व बाराव्या म्हणजे मीन राशीत भ्रमणाचा कालावधी पंचक म्हणून ओळखला जातो.
या कालावधीत 'पाच नक्षत्र' येतात. ती येणेप्रमाणे धनिष्ठा (चतुर्थचरण), शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती (प्रथमचरण).
पंचकाचा संबंध वाराशी सुद्धा जोडला जातो. त्यात बुधवार व गुरुवार यांचा शुभ दिवसात समावेश होतो त्यामुळे या दिवशी मृत्यू झाल्यास भय नसते. इतर वारी फळ असे सांगितले आहे.
रविवार..मानसिक त्रास
सोमवार.. सरकारी कामात यश
मंगळवार.. अग्नीपासून भय व वादविवाद
शुक्रवार..धनहानी, चोरी
शनिवार.. दुर्घटना
तसेच पंचक काळात नवीन खरेदी, घराची दुरुस्ती इत्यादी करू नये असे सांगितले आहे.
परत याबाबतीत दक्षता म्हणून 'शांतीचा' प्रस्ताव आलाच. हाही विधी पुरोहित स्मशानातच करीत असतात.
जर भडांग्नी दिला वा पुरोहिताविना दाह संस्कार केल्यास शांतीविधी दहाव्या दिवशी करण्याची प्रथा आहे.
त्रिपाद व पंचक यांचे अनिष्ट परिणाम अनुक्रमे तिप्पट व पाचपट होतात असा समज पसरलेला आहे म्हणून शांती.
प्रश्न असा येतो की जे हे मानत नाहीत, विधी पाळत नाहीत, त्यांना असा वाईट अनुभव आला आहे का... उत्तर सापडत नाही.
विषाची परीक्षा नको असे गृहीत धरून बहुतांशी घरी त्रिपाद व शांती करण्यास मान्यता दिली जाते.
हा श्रद्धेचा वा अंधश्रद्धेचा भाग आहे हे ज्याने त्याने ठरवावे.
जर हा सोपस्कार करावयाचा नसेल तर मात्र आपले मत ठाम ठेवावे व येणाऱ्या परिणामास धीराने सामोरे जावे... मी केले व ना केले तरी माझ्या प्रारब्धात जे आहे ते टळणार नाही असे धरून पुढील आयुष्याची वाटचाल सुकर करण्याचा प्रयत्न करावा.
टीप : रावणाचा मृत्यू पंचक काळात झाला होता असे वर्णन आहे. त्यामुळे त्याच्या कुळावर खूप मोठी आपत्ती आली हे उदाहरण भीती उत्पन्न करण्यासाठी तर दिले गेले नाही ना असा संशय येतो.
दत्तात्रय फणसे👌👍
ReplyDeleteThank you
Delete