प्रथांमागील शास्त्र

आज आपण आपल्या काही प्रथांच्याकडे वेगळ्या नजरेने, ते सुद्धा त्याला शास्त्रीय पार्श्वभूमी असू शकते का या दृष्टीने विचार करूया.

१. झोपेची स्थिती

झोपताना पाय दक्षिणेकडे करून झोपू नये, असे आपले वाडवडील सांगत आले आहेत. ते असेही सांगतात की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. थोडक्यात, उठताना तोंड दक्षिणेकडे असते व चाल दक्षिणेकडे सुरू होते. परत्वे आपण यमाकडे म्हणजे मृत्यूकडे वाटचाल सुरू करतो.
तसे पाहता आपल्या आयुष्यात येणारा नवा दिवस आपल्याला मृत्यू जवळच घेऊन जात असतो. तसेच यम फक्त दक्षिणेकडूनच येतो हे कुठवर खरे आहे? ...जर यमराज दक्षिणेकडूनच वाटचाल करून आपल्यापर्यंत पोहोचणार असेल तर आपण दक्षिण दिशा टाळून यमाच्या मार्गातून दूर होऊ शकतो व मृत्यू टाळू शकतो. परत्वे, अमरत्व प्राप्त होणे सहज शक्य झाले असते पण तसे होत नाही. "जातो ध्रुव: मृत्यू:" असे म्हणण्याची वेळच आली नसती.

दक्षिण ध्रुव पॉझिटिव्ह एनर्जी व उत्तर ध्रुव निगेटिव्ह एनर्जी दर्शविते हे ध्यानात घेतले तर असे दिसते की दक्षिणेकडे पाय म्हणजे उत्तरेकडे डोके. म्हणजेच दिवसभराच्या रामरगाड्यातून थकलेल्या मेंदूवर उत्तरेची निगेटिव्ह एनर्जी अंमल करते. आजच्या स्पर्धा युगात हे नसावे अशी भावना प्रत्येकाची असणे हे अगदी बरोबर आहे. असा विचार करता दक्षिणेकडे पाय न करता डोके त्या दिशेला ठेवून झोपल्यास त्या दिशेचा पॉझिटिव्ह एनर्जीचा लाभ नक्कीच मिळेल.

२. सुंठवड्याचा प्रसाद

हा प्रसाद मुख्यत्वे राम नवमीहनुमान जन्मोत्सवाला वाटतात. हे दोन्ही सण चैत्र महिन्यात येतात. या काळात वातावरण असे असते ज्यामुळे कफ पित्त याचा प्रकोप जास्त जाणवतो. साखर अथवा गूळ कफ पातळ करण्याची क्रिया करतात. सुंठ कफ तर पातळ करतेच, शिवाय वातक्षमनाचे कार्य सुद्धा करते. याचा विचार करता सुंठ पावडरपिठीसाखर याचे मिश्रण प्रसाद म्हणून सेवन केल्यास ते औषध रूपाने पोटात जाते व अनायसे निर्माण झालेला वा होत असलेला कफ-पित्त दोष क्षमन करण्यास कारणीभूत ठरते हा यामागील उद्देश असू शकतो. इतर गोष्टी या दोन्ही सणात प्रसाद म्हणून देवांना अर्पण केल्या गेल्या तरी सुंठवडा हा प्रसाद आवर्जून दिला जातो हे लक्षात असू द्या.. त्याचे कारण त्याचा औषधी गुणधर्म.

३. पानात मीठ, लिंबाची फोड 



आजही जेवणाच्या ताटात जेव्हा पदार्थ वाढले जातात तेव्हा सुरुवात मीठापासून होते. अगदी बुफे सिस्टम असली तरीही मीठाचा बाउल असतोच. असे का याचा विचार केला असता असे जाणवते की प्रत्येक वेळी तयार झालेला अन्नपदार्थ चाखून पाहणे हे उचित वाटत नाही, मानले जात नाही विशेषता जेव्हा आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. तसे करणे म्हणजे उष्ट्याचा नैवेद्य दाखवणे झाले जे आपल्या मनाला रुचत नाही. हा धार्मिक विचार क्षणभर बाजूला ठेवूया. प्रत्येकाची पदार्थातील मिठाची गरज/रुची भिन्न असते. असे वेगळे वाढलेले मीठ त्याची पूर्तता करण्यास उपयोगी ठरते. 
जेवण झाल्यावर हस्तक्षालनाआधी मीठ बोटांना चोळले तर बोटांना आलेला ओशटपणा, तेलकटपणा घालवण्यास मदत होते मग हँडवॉश लागत नाही. तसेच जेवणानंतर मुखक्षालन करताना मीठ लागलेली बोटे दातावरून फिरवल्यास दात साफ होतात हाही फायदा आहेच. मिठाच्या जोडीला लिंबाची फोड असेल तर उत्तमच. लिंबू मिठाचे मिश्रण म्हणजे ओशटपणा घालवण्याचे व दंतमंजनाचे काम करणारे असे दुहेरी औषध होऊ शकते. मंडळी आता लक्षात आले असेल की फिंगर बाऊलमध्ये लिंबाची फोड का असते. थोडक्यात पूर्वजांनी किती दूरदृष्टीकोनातून या पद्धती निर्माण केल्या याची प्रचिती येते.

We owe great respect to our ancestors for their foresight in embedding scientific principles within these cultural practices.



Comments

  1. प्रत्येक ब्लॉगची माहिती खूपच उपयुक्त असते

    ReplyDelete
  2. साप्ताहिक दिलेली माहिती खूपच महत्त्वाची असते. धन्यवाद.--- विश्वास

    ReplyDelete
  3. दत्तात्रय फणसे उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment