प्रथमत: दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
बऱ्याच वाचकांना माझ्या गतवर्षीच्या आकाशकंदीलाची गोष्ट माहित नसावी. ती थोडक्यात सांगते: गेल्या वर्षी बाजारात आवडीचा कंदील न मिळाल्याने मी घरी कागदी कंदील तयार केला (त्यात नवे ते काय?). माझा हा उपक्रम किंवा कंदीलच निसर्गराजास आवडला नसावा. दिवाळीमध्ये मुसळधार पाऊस पडून कंदीलाची स्तिथी फार दयनीय झाली. तेव्हा मी ठेवले की पुढच्या वर्षी कंदील करेन तर कपडाचाच.
पण ह्या वर्षी झाले काय?
मला माझी प्रतिज्ञा अगदी नीट ध्यानात होती. जसा August महिना उजाडला, माझे बंधू भगिनी गणेश आगमनाची तयारी करू लागले आणि मी माझ्या कापडी आकाशकंदीलाची. मला साधारण कल्पना होती पण हवा तसा आराखडा मिळत नव्हता. 'मन मे है विश्वास पुरा है विश्वास, हम होंगे कामयब एक दिन' असे गाणे म्हणत मी साहित्य गोळा करायला सुरुवात केली.
गरज प्रोत्साहनाची नव्हती, परंतु गरज होती मार्गदर्शनाची. माझ्या ओळखीत असे काही गुणवंत नव्हते ज्यांना कापडी कंदील करण्याची कला अवगत होती. मग अशा स्तिथीत मी तेच केले जे आधुनिक गरजू करतात. मी परमगुरु सर्वज्ञानी YouTube गुरुजींकडे नतमस्तक झाले. गुरुजींनी मला अनेक कल्पना दाखवल्या, त्यातली मी सगळ्यात सोपी कल्पना निवडली (कलाकृती करताना 'अंथरुण पाहून पाय पसरावे', ही म्हण किती चपखल आहे हे समजते). YouTuber वारंवार सांगत होत्या की कंदील 10 मिनिटात तयार होईल, पण माझी कुवत लक्षात घेता मला खात्री होती की मला काही दिवस लागतील.
मग काय लागले कामाला. सप्टेंबर संपत आला आणि माझा बेत मी अधोरेखित केला. कोणत्या दिवशी काय करायचे हे तारखे प्रमाणे ठरवले. वेळ आणि गर्दी विचारात घेऊन नवरात्रीच्या आधी सगळ्या सामानाची खरेदी केली. नवरात्रीच्या पवित्र सणात कंदील तयार करायला आरंभ केला.
चार पुट्ठे कापून घेतले. त्यावर सोपे चौरस कापले. मग त्यांना चिकटवले. त्यावर कापड लावले. कापड लावताना समजले की कंदील खूपच साधा दिसत आहे. दिवाळीची vibe येत नाही आहे. अशा परिस्थितीत चित्र काढणे भाग होते. तेव्हा मी पवित्र आणि काढायला सोपे असे स्वस्तिक निवडले. Acrylic colours ना सुकायला वेळ लागतो म्हणून माझा आधीचा बेत एका दिवसाने राखडला.
चित्र काढून झाल्यावर कंदील जरा बरा दिसायला लागला, तरी थोडी vibe ची कमी वाटत होती. मग ribbons आणि pompom ना एकत्र घेऊन काही तरी कलाकुसर केली, तेव्हा वाटले की आता कंदील सणासाठी सज्ज झाला आहे.
पण अजून नवीन समस्या उभी राहिली. हा नाजूक कंदील cube चा आकार घेत नव्हता. मिटून जात होता. अश्या वेळी गरज होती एका साध्या उपयाची. मी घराची उलथापालथ केली आणि माझ्या समोर आला एक प्लास्टिक चा खोका. ह्या खोक्याला कापून त्याला कंदीलाला लावला आणि कंदील cube च्या आकारात उभा झाला.
कापडी कंदील करणे सोपे नव्हते, पण अशक्यही नव्हते. थोडी चिकाटी आणि hacks वापरून हे शक्य झाले. माझ्यासाठी हा एक नवा उपक्रम तर झालाच, पण त्याबरोबर हा एक चांगला कलाकृतीचा धडा देखील होता.
असो, ह्या वर्षी काही पुढच्या वर्षी कसा कंदील करायचा हा संकल्प सोडला नाही. पुढच्या वर्षीचे पुढच्या वर्षी बघू.




कंदिल आणि वर्णन छान. मावशी
ReplyDeleteThank you
Delete