आपल्यापैकी किती जण खालील कृतीचा नित्याने वापर करतात हे सांगणे/ समजणे कठीण आहे.
... आपले पूर्वज सांगत असत की सकाळी अंथरुणातून बाहेर यायच्या आधी "कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम्" हा श्लोक म्हणून तळहातांचे दर्शन घेऊन ते चेहऱ्यावरून थोडासा दाब देऊन फिरवत बेंबीपर्यंत आणावे. असे तीन वेळा करावे. हा श्लोक म्हणण्यापूर्वी "वक्रतुंड, महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नम कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा" हा श्लोक म्हणावा.
यामागील शास्त्रीय दृष्टिकोन असा असावा..
अंथरुणातून उठून झटदिशी उभे राहून चालण्याची क्रिया सुरू केली असता आपला तोल जाण्याची शक्यता असते. (रक्तदाबातील बदलामुळे.. आडवे ते उभे).. हे दोन श्लोक म्हणण्याच्या प्रक्रियेत काही क्षण जातात, जे रक्तदाब पूर्ववत होण्यास उपयोगी ठरतात. तसेच चेहऱ्यावरून व बेंबीपर्यंत हात किंचित दाब देऊन फिरल्याने ॲक्युप्रेशर पॉईंट्स ऍक्टिव्ह होतात ज्याचा परिणाम सुलभ शौच व अपानवायू विसर्जन यासाठी कामी येतात... बघा आपले पूर्वज शास्त्रीय दृष्ट्या किती प्रगत होते... "Hats off to our ancestors ".
असेच काहीसे सकाळी उठल्यावर मुखमार्जन झाल्यावर प्रथम पाणी प्यावे असे सांगितले जाते. या क्रियेला "उषःपान" म्हणतात. रिकाम्या पोटी पाणी पिण्याने रात्रभर साचून राहिलेले पोटातील वायू खालील दिशेने मार्गक्रमण सुरू करतात. थोडक्यात हे अपानवायू शौचक्रिया सुलभ होण्यासाठीची पूर्वतयारी करतात.
हल्ली योग, जिम यांचे फॅड आहे. हे अयोग्य आहे असा माझा मुळीच दावा नाही. याच्या निमित्ताने का होईना एकाच जागी बसून काम करण्यापासून विरंगुळा तर मिळतोच,पण अवयव हालचालीही होतात.
परंतु सूर्यनमस्कारास तरणोपाय नाही. किती सूर्यनमस्कार रोज घालावे हे ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार ठरवावे.परंतु एका गोष्टीची जाणीव होते... ती म्हणजे शरीराच्या सर्व गात्रांची हालचाल होते. जिथे स्नायूंवर दाब येणे आवश्यक आहे तिथे योग्य प्रमाणे दाब येतो. या साऱ्यामुळे रक्ताभिसरण, बॉडी ट्युनिंग इत्यादी सुद्धा साध्य होते.
हल्ली स्त्रियांनी बांगड्या घालणे जवळजवळ सोडून दिले आहे. बिच्चारे कासार... पारंपारिक धंदा बदलण्याचा विचार करीत आहेत. हल्लीच्या पिढीने तर कासार हा शब्द सुद्धा ऐकला नसेल... असो.. ॲक्युप्रेशर नुसार गर्भाशयाचा पॉईंट मनगटाच्या अंगठ्याच्या खालील बाजूस असतो तर ओवरीजचा पॉइंट करंगळीच्या खालील बाजूस असतो. बांगड्या धारण केल्या असता त्यांचा हलका दाब या प्रेशर पॉइंटवर सतत पडतो. हा दाब स्त्रियांना जाणवणारे विकार..जसे की ओटी पोटात दुखणे, पाळी साफ न होणे, टाचा दुखणे इत्यादी. या सर्वांवर प्रेशर पॉईंटवर पडणारा सततचा हलका दाब या विकारांपासून रिलीफ मिळण्यास मदत करतो.
कुंकवाचे बाबतीतही असेच काही आहे...हल्ली एकतर स्त्रिया कुंकू लावत नाहीत व वापरच करायचा झाला तर टिकली...
दोन भुवयांच्या मध्ये एक प्रेशर पॉईंट असतो. कुंकू/ टिकली हा दाब निर्माण करते. जो २४ तास कार्यरत असतो..स्त्रियांसंबंधी रोगांमध्ये या प्रेशर पॉइंटच्या कार्यरत राहण्याने रिलीफ मिळतो. टिकलीपेक्षा शुद्ध ओले कुंकू (पूर्वी मेणाचा वापर होत असे) दररोज लावले असता फायदा होतो असे संशोधनात दिसून आले आहे.
ज्यावेळी हा ब्लॉग वाचण्यासाठी माझ्या महिला भगिनींना वेळ मिळेल तेव्हा त्या दिवाळीचे टाईम टेबल आखत असतील. मला खात्री आहे की वेळात वेळ काढून त्या हा लेख वाचतील व विचार करतील.
धन्यवाद.




खूप उपयुक्त माहिती
ReplyDeleteदत्तात्रय फणसे उपयुक्त माहिती
ReplyDelete