आम्ही जातो अमुचा गावा, आमचा राम राम घ्यावा.



देहांत व अंत्यसंस्कार या विषयावर लिहिताना हे माझ्या ध्यानात आहे की ज्यावेळी हा ब्लॉग प्रसिद्ध होईल त्यावेळी शारदीय नवरात्राचा प्रारंभ झाला असेल व घटस्थापनेची लगबग चालू असेल.

तरीही, हे लक्षात असू द्या की ही अश्विन शुद्ध प्रतिपदा मातामह श्राद्ध दिन म्हणूनही पाळली जाते. 'या दिवशी आईच्या दिवंगत वडिलांचे श्राद्ध कर्म केले जाते'.

' जातस्य हि ध्रुवो मृत्यू :|' जन्मलेल्या प्रत्येकास मरण ठरलेलेच आहे. ती काळवेळ, विधीलिखित असली, तरी आपल्याला ज्ञात नसते. मग त्यासंबंधी लिहिण्यास काळाचे बंधन का असावे.

आज-काल मृत्युपश्चात दाह संस्काराची माहिती असणारे जाणकार, पुरोहित विरळ होत चालले आहेत. बऱ्याच ठिकाणी आउटसोर्सिंग (उदाहरणार्थ अंतिम संस्कार सेवा) केले जाते, म्हणून आमच्या नंतरची व आत्ताची तरुणाई यांना काही बेसिक गोष्टी सांगण्यासाठी हा खटाटोप आहे.

अंत्यसंस्कार अग्नी उपासनेत मोडतो. येथे मृतदेहाची आहुती अग्नीला समर्पित करीत आहोत अशी भावना आहे. हे ध्यानी ठेवून, मृताबद्दल आदर व्यक्त करीत, शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने हा विधी पार पाडावा.

मरण कोणालाही चुकत नाही हे माहीत असून सुद्धा मरण सुखद नसते हे मात्र खरे. तरीही जेथे मृतदेह दर्शनासाठी ठेवला आहे तेथील वातावरण कमीत कमी शोकविव्हळ राहील असे पाहावे. म्हणून अशा ठिकाणी गीतापठण अथवा रामनामाचा जप करावा.

आज-काल मृतदेह शववाहिनीतून स्मशानात नेला जातो. त्यामुळे घरातून नेताना "जय जय राम कृष्ण हरी" "रघुपति राघव राजाराम,पतित पावन सीताराम"अथवा "श्रीराम जयराम, श्रीराम जयराम" असा उदघोष करावा.

पूर्वी पतीचे निधन झाले असता पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेऊन ते प्रेताबरोबर दहन करण्याची प्रथा होती. व्यावहारिक दृष्ट्या हे संपूर्ण चुकीचे आहे. मंगळसूत्राचा त्याग केला पाहिजे हे सुद्धा पत्नीच्या दुःखावर डागण्या देण्यासारखेच आहे. जर पतीनिधनपश्चात पत्नीला मंगळसूत्र घालणे उचित वाटत नसेल, तर त्यातील सोन्याचा वापर एखादी माळ/गोफ (chain) करून पतीची कायमस्वरूपी आठवण म्हणून पत्नीने ती धारण करावी,असे माझे प्रांजळ मत आहे.

दुःखात बुडलेल्या पत्नीवर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती, कुठल्याही स्वरूपात करू नये.

मृतदेह घरातून स्मशानात नेताना ती व्यक्ती पुन्हा परत कधीच न येण्यासाठी दूरवरच्या प्रवासाला निघाली आहे असे समजून त्याला शेवटचा निरोप द्यावा (अंतिम बिदाई).. असा विचार करूनच, मृतदेह माफक प्रमाणात सजवित असावेत... जसे की पुरुषास कपाळी बुक्का लावणे, टोपी घालणे, स्त्री असल्यास तिला साडीचोळी नेसवणे, सवाष्णा स्त्री मृत असल्यास ओटी अर्पण करणे (शक्यतो ती माहेरची असावी असा रूढसंकेत आहे)...मृतदेहावर फुले, हार इत्यादी अर्पण करून मग मार्गस्थ व्हावे. हल्ली तर शाल अर्पण करतात. त्याचा वापर होत नाही. थोडक्यात धनाचा अपव्यय होतो.

मार्गस्थ होताना चार खांदेकरी असतात, दोन पुढे, दोन मागे... स्मशानात प्रवेश करण्यापूर्वी पुढचे दोन खांदेकरी मागे व मागचे पुढे अशी उलटा पालट करतात. ही रूढी आहे. याचे पालन झालेच पाहिजे असे नाही. खांदेकऱ्यांना चालल्यानंतर थोडीशी उसंत यामुळे प्राप्त होते, हा या मागचा हेतू असावा.

पुरोहिताकडूनच समंत्रक अग्निसंस्कार करावे असेही नाही. काहींना त्यांची दक्षिणा परवडत नाही वा मृत व्यक्तीने अशी इच्छा प्रकट केलेली असते की माझ्यावर कोणत्याही प्रकारचे संस्कार करून माझा मृतदेह जाळू नये. जर असे असेल तर असा विधी टाळणे उचितच.

आपल्या मानसिक समाधानासाठी प्रेत सरणावर ठेवल्यावर अग्नी देण्यापूर्वी रामरक्षा पाठ पठण करावा.

मृत्यूनंतर स्मशानात अमुक अमुक विधी केले तरच मृत व्यक्तीस सद्गती मिळेल, एरवी नाही अशी भ्रामक कल्पना आहे... गीतेत, भगवंत सांगतात.. जो जे मला अर्पण करेल. त्यात त्याची खरी खरी भक्ती व श्रद्धा मला दिसेल आणि ते दिसणे आवश्यक आहे. मला हेच अभिप्रेत आहे.

केवळ समाजाच्या भीतीपोटी ते करणे म्हणजे जनलज्जेपोटी केलेले ते ढोंगच म्हणावे लागेल.

निसर्ग जपण्यासाठी झाडे जगणे महत्त्वाचे. अशाच झाडांच्या फांद्यांचा वापर देह जाळण्यासाठी केला जातो. हे घडू नये असे वाटत असेल तर या वनसंवर्धनासाठी आपला खारीचा वाटा म्हणून विद्युतदाहिनीचा वापर करणे उचितच ठरेल व त्यामुळे आपण वायुप्रदूषण कमी होण्यासही हातभार लावतो.

आता तर अवयवदानाच्या जोडीला मृत्यूपश्चात देहदान करण्याचा संकल्पही वाढीस लागत आहे. वैद्यकीय शास्त्राच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी हा मृतदेह उपयोगी ठरतो. थोडक्यात मृत्यूनंतरही आपण समाजाच्या उपयोगी पडतो जर आपण देहदान संकल्प केला तर. दधीची ही संस्था हया बाबतीत मार्गदर्शन करते. ही बोरिवली येथे आहे.

तरीही अग्नीसंस्कारच करायचे असतील तर स्मशानातील इतर विधीत वेळ व पैसा व्यतीत करावा का यावर विचारमंथन करून आपल्या मृत्यूपश्चात आपल्या देहावर किती व कसे सोपस्कार करावेत हे आधीच ठरवणे किंवा लिखित स्वरूपात नोंद ठेवणे योग्य. त्याबाबत आपल्या खास वर्तुळात याबाबत माहिती देणे हे आपले कर्तव्य आहे.. जेणेकरून आपल्या मृत्यूनंतर काय करावे याबाबतची भावना पूर्णत्वास जाते व आपण समाजाचे ऋण काही अंशी फेडण्यास हातभार लागतो.




Comments

  1. व्यवहारिक दृष्ट्या अगदी योग्य माहिती

    ReplyDelete
  2. दत्तात्रय फणसे 🙏

    ReplyDelete

Post a Comment