रुद्राक्ष भाग द्वितीय


 आदरणीय वाचकहो,

मागील भागात आपण रुद्राक्षाच्या उत्पत्ती, प्रकार, पारख, इत्यादी विषयांवर बोललो. आज रुद्राक्षाचे फायदे व ते कोणी, कशासाठी धारण करायचे याविषयी काय प्रघात आहेत ते बघूया.

सुरुवातीलाच मी कै. डॉ. राधाकृष्ण श्रीमाली व त्यांचे सुपुत्र पंडित कमल श्रीमाली यांचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करू इच्छितो. त्यांनी गुढविद्या व तत्सम विषयांबाबत जी ग्रंथसंपदा निर्मित केली आहे, ते ज्ञानभांडार माझ्यासाठी उपलब्ध केले, त्यामुळे माझे संदर्भ शोधणे सुकर झाले...

तसेच "श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत" या दिव्यग्रंथात, रुद्राक्षासंबंधी व्यक्त केलेले विचार व मार्गदर्शन माझ्यासाठी अमूल्य ठेवा ठरले. 

 श्रीपाद श्रीवल्लभ नमो नमः ||

चला सुरू करूया.

विविध मुखी रुद्राक्ष:

एक मुखी: हा प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. हा धारण करणाऱ्यास कुठल्याही प्रकारची कमतरता भासत नाही. दमा, ताप, नेत्ररोग इत्यादी व्याधींच्या शमनार्थ हा उपयोगी ठरतो. याचा मंत्र "ॐ ऱ्हिम नमः|".

 द्विमुखी:  हा अर्धनारी स्वरूप आहे. याच्या धारणेने तामसी प्रवृत्तींचा नाश होतो. एकाग्रता वाढते. चित्त शांत राहते...तांत्रिक व वशीकरण क्रियेतही याचा वापर करतात. सर्दी, कफ, उदरविकार बरे होण्यास याच्या धारणेचा प्रभाव दिसतो. सोमवारी शिवलिंगाचे दर्शन घेऊन "ॐ अर्घनेश्वर देवाय नमः|" असा मंत्रोच्चार करून धारण करावा किंवा याचा बीज मंत्र "ॐ नमः" असा आहे त्याचा वापर करावा.

 त्रिमुखी:  हा अग्नी स्वरूप आहे. हा धारण करणारा साधक सदैव कार्यरत राहतो. नोकरी प्राप्त करण्यासाठी व विद्या वृद्धीसाठी हा प्रभावी ठरतो. विद्यार्थ्यांनी हा नक्कीच धारण करावा. कावीळ रोगात हा धारण केला असता त्याचा त्वरित परिणाम जाणवतो. रविवारी सूर्योदयाचे वेळी "ब्रह्मा विष्णू देवाय नमः |"हा मंत्र म्हणून धारण करावा.

 चतुर्थमुखी:  हा ब्रह्म स्वरूप आहे ज्यामुळेच बुद्धी, स्मरणशक्ती, वाक्चातुर्य, याच्या उत्तम वाढीस उपयुक्त ठरतो.  दुधात हा रुद्राक्ष टाकून असे उकळलेले दूध प्राशन केले असता स्नायू दौरबल्य, मस्तकशूल इत्यादी सारखे रोग बरे होतात. केळ्याच्या वृक्षाला स्पर्श करून व" ॐ ब्रह्मदेवाय नमः" हा मंत्र म्हणून धारण करावा.

 पंचमुखी: हा कालाग्नी स्वरूप आहे. भगवान शंकराचे प्रतिक असा मान या रुद्राक्षास दिला आहे.  शत्रुसंहार, शांती व समृद्धीकारक आहे. विषारी कीटकांपासून हा आपले संरक्षण करतो. हा धारण करण्यापूर्वी शिवलिंगाचे दर्शन घ्यावे व "ॐ नमः शिवाय" या मंत्राचा जप करावा.

 षष्ठमुखी:  हा कार्तिकेय व गणेश या शिवपुत्रांचे एकत्र रूप आहे. हा धारण केला असता व्यापारात वृद्धी होते, उत्तम बुद्धी प्राप्त होते, दुःख दारिद्र्य नष्ट पावते, लक्ष्मीचा कृपाप्रसाद लाभतो. घरात अन्नपूर्णेचा वास सदैव राहतो. सैन्य दलात कार्यरत असलेल्या व्यक्तीने स्वसंरक्षणार्थ याचा वापर करावा. महिला वर्गास त्यांच्या स्त्रीजन्य व्याधींसाठी हा उपयुक्त ठरतो. सोमवारी शिवलिंगाचे दर्शन घेऊन "ॐ नमः शिवाय,कार्तिकेय तथा गणेशाय नमः|" हा मंत्र जपत धारण करावा.

सप्तमुखी :  हा रुद्राक्ष सप्तमाला देवींचे प्रतिनिधित्व करतो. हा धारण करणारी व्यक्ती दीर्घायुषी ठरते. अकाल मृत्यू व शस्त्र प्रहार यापासून संरक्षण प्राप्त करते. साडेसाती काळात हा रुद्राक्ष आवर्जून परिधान करावा. सोमवारी "ॐ नमः शिवाय,भगवान ऋषी नमः|" हा मंत्र जपून परिधान करावा.

 अष्टमुखी:  हा रुद्रभैरव स्वरूप असून अष्टदेविंचेही प्रतिनिधित्व करतो. ज्ञानप्राप्ती, चित्तशांती, एकाग्रता यासाठी याचा वापर अमूल्य मानला जातो. तसेच तांत्रिक बाधेपासूनही हा आपले रक्षण करतो. पॅरलेसिस, जलोदर आदि व्याधींमध्ये याची धारणा उपयोगी ठरते. याचा बीज मंत्र "ॐ ऱ्हिम हृम नमः"| असा आहे या रुद्राक्षाचा स्पर्श नेहमी डोळ्यास करावा.

 नवमुखी:  हा कपिल मुनी स्वरूप असून नवशक्तींचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे याच्या साधनेने यश, शत्रुशमन, खटल्यात सफलता प्राप्त होते. महिला वर्गासाठी हा विशेष शुभ मानला जातो. केतूच्या अमलामुळे, हा रुद्राक्ष हृदयरोगात सुद्धा प्रभावी ठरतो अशी धारण आहे. सोमवारी लाल दोऱ्यात ओवून व "दुर्गायाम नमः"| हा मंत्र उच्चारून धारण करणे ईष्ट.

 दशमुखी :  हा साक्षात रुद्र स्वरूप आहे व यमदेवतेचेही प्रतीक मानले जाते. तंत्रक्षेत्रात याचा प्रामुख्याने वापर केला जातो, म्हणून हा धारण करणाऱ्यास तंत्र प्रयोगापासून संरक्षण प्राप्त होते. पुत्रप्राप्तीसाठी हा अवश्य धारण करावा. उजव्या दंडावर लाल दोऱ्यात ओवून हा धारण करावा.

 एकादशमुखी :  स्त्रीवर्गासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जातो. पतीची सुरक्षा, उन्नती, दीर्घायु, संतान सुखप्राप्ती, गृहशांती व प्रसन्नता यामुळे प्राप्त होते. आपल्या इष्ट देवतेचे चरणस्पर्श करून हा धारण करावा.

 द्वादशमुखी: हा आदित्य तथा विष्णूचे स्वरूप मानला जातो. हा धारण केला असता चेहरा तेजस्वी भासतो, मान प्रतिष्ठा प्राप्त होते. पिवळ्या रंगाच्या दोऱ्यात ओवून "ॐ सूर्य देवाय नमः"| हा मंत्र जपून धारण करावा. 

 त्रयोदशमुखी : हा काम देवाचे प्रतीक मानला जातो. इच्छापूर्तीसाठी हा विशिष्ट प्रकारे सिद्ध केला जातो. पिवळ्या अथवा लाल दोऱ्यात ओवून" इंद्रदेवाय नमः"| हा मंत्र उच्चारून धारण केला तरी इच्छापूर्तीस पूरक ठरतो. नपुंसकता दूर करण्यासाठी दुधात हा रुद्राक्ष टाकून उकळलेले दूध प्राशन केले असता त्याचा अंमल प्रभावाने जाणवतो.

 चतु:दशमुखी : सर्व रोग हरण करण्याची क्षमता यात आहे. त्यामुळे हा धारण करणारा साधक निरोगी राहतो. सोमवारी शिवलिंगाचे दर्शन घेऊन "ॐ नमः शिवाय "हा मंत्र म्हणून धारण करणे उचित मानले जाते.


कोणताही शुद्ध रुद्राक्ष काळ्या अथवा लाल दोऱ्यात ओवून देवघरात स्थापन करावा. पितृपक्ष काळात याची एक माळ "ॐ नमः शिवाय" हा मंत्र जपून करावी. यात खंड पडता कामा नये. सर्वपित्री अमावस्येच्या दिनी मंत्र जपमाला पूर्ण झाल्यावर तो गळ्यात धारण करावा. यापासून "पितृदोष" समस्येला पूर्णविराम मिळतो असा समज आहे.


अभिमंत्रित करून सिद्ध केलेले रुद्राक्ष विकणारे अनेक आहेत. त्यांच्याकडून खरेदी करणे वा न करणे हा श्रद्धेचा भाग आहे.


आपण जर वर्ण मानत असू तर कालाग्नी रुद्रानी असे सांगितले आहे की श्वेत वर्णी रुद्राक्ष ब्राह्मणांनी, क्षत्रियांनी लाल, वैश्यांनी पिवळा व शुद्रांनी काळ्या रंगाचा रुद्राक्ष परिधान करावा.

रुद्राक्षाचे महात्म्य जाणले असता, केवळ सर्व रुद्राक्षांचा उचित  वापर व्हावा या संकल्पनेतूनच हा विचार रूढ झाला असावा अशी माझी धारणा आहे....

... परमपिता भोलेनाथ उच्च नीच असा वर्णभेद कधीच करत नाही. तो तुमचा भाव जाणतो. याची प्रचिती त्याला भक्तीत दिसते.


 इति रुद्राक्ष महात्म्य समाप्तमं |

Comments

  1. दत्तात्रय फणसे उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment