आजच्या विषयाची व्याप्ती एवढी मोठी आहे की त्यावर लिहिताना संकलित माहिती कितीही त्रोटक स्वरूपात सादर करायचे माझे प्रयत्न तोकडे पडत आहेत. म्हणून काही भागात त्याचे विभाजन करणे हाच उपाय दिसत आहे.
असो,आता विषयाकडे वळूया.
ग्रहशांती, ग्रहांची अंगठी, ज्योतिषी, वास्तुतज्ञ, संख्याशास्त्री यांचे पेव फुटले आहे. त्यात रुद्राक्ष धारण करणे हे सुद्धा आलेच.
रुद्राक्ष बद्दल माझे छोटेसे मनोगत
रुद्राक्षाला भगवान शंकरांचा प्रसाद किंवा साक्षात त्यांचे रूप मानले जाते. त्यामुळे रुद्राक्षाची देवतास्वरूप पूजा केली जाते, ज्यामुळे अशी देवतारूप वस्तू शरीरावर धारण करण्याचे काही नियम निर्माण केले गेले असावेत.
एखाद्या मंदिरात देवतेची मूर्ती स्थापन करताना जसा 'प्राणप्रतिष्ठा' सोहळा होतो, काहीसा तसाच रुद्राक्ष धारण करताना होतो असे दिसते.
परमेश्वर व त्याची शक्ती आपल्या पर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणून रुद्राक्ष कार्यरत असतो. थोडक्यात रुद्राक्ष धारण करणाऱ्यास सुख समृद्धी प्राप्त होते. त्याला आळस, रोग इत्यादींची बाधा क्वचित होते. त्याला पिशाच्चबाधेचे भय नसते.
योग्यरित्या अभिमंत्रित केलेला रुद्राक्ष जाणकारांच्या सल्ल्याने योग्य दिवशी, योग्य वेळी व उचित धातूत गठीत करून परिधान करण्याचा प्रघात आहे.
रुद्राक्ष हा भगवान भोलेनाथांचा प्रिय अलंकार आहे. त्याची उत्पत्ती कशी झाली, तो कुठे मिळतो, "असली -नकली" कसा ओळखावा, तो किती मुखी असावा, धारण करण्याचा काही मंत्र आहे का व धारण केल्यावर काही बंधने पाळावी लागतात का असे अनेक प्रश्न मनात येतात, याचा उलगडा जसा जमेल तसा करण्याचा प्रयत्न करीत आहे.
रुद्राक्ष म्हणजे काय
रुद्र + अक्ष अशी रुद्राक्ष या शब्दाची फोड आहे. रुद्र म्हणजे शिव व अक्ष म्हणजे वीर्य वा रक्त वा अश्रु. याचा आकार छोट्या बोरासारखा असतो. याचे झाड नेपाळ व मलेशियात आढळते. रुद्राक्ष चार रंगाचे असतात 'श्वेत, लाल, काळा व मिश्रित' अश्या रंगात आढळतात. रुद्राक्ष फळावर उभ्या रेषा असतात त्याला मुख असे संबोधतात. मुखांच्या संख्येनुसार रुद्राक्ष एकमुखी ते चौदा मुखी असे विभागले गेले आहेत. पंधरा ते एकवीस मुख असलेले रुद्राक्ष सुद्धा सापडतात. पण ते दुर्मिळ असतात, त्यामुळे त्यांची किंमत सुद्धा तशीच असते. वापर मात्र एकमुखी ते चौदा मुखी रुद्राक्षाचाच होतो.
रुद्राक्षाची निर्मिती
रुद्राक्ष हे फळ झाडाला लागते तेव्हा त्याचा रंग हिरवा असतो. आठ ते दहा महिने हे फळ झाडावर टिकून राहिले तर ते सुकते व टणक होते व नंतर झाडापासून विभक्त होते. त्यालाच रुद्राक्ष म्हणतात. एकाच झाडाला वर वर्णन केल्याप्रमाणे रंगीत व विविध मुखी रुद्राक्ष फळे लागतात.
रुद्राक्ष छिद्र विरहित असते. माळ करण्याकरता त्याला छिद्र पाडले जाते ही एक कला आहे. रुद्राक्ष हे एकमेव फळ आहे ज्याचे सेवन केले जात नाही व कुठल्याही देव देवतेस अर्पण केले जात नाही. म्हणून फळश्रेणीतील रुद्राक्ष हे एकमेव-अद्वितीय असे फळ मानले जाते.
रुद्राक्ष उत्पत्तीची कथा
त्रिपुरासुर उन्मत्त होऊन ऋषीमुनींना व देवदेवताना त्रास देऊ लागला. त्याच्यापासून साऱ्यांचे रक्षण करण्याचे विचारमंथन भगवान शंकर ध्यानमग्न होऊन करीत होते. त्यावेळी त्यांच्या नेत्रातून जलाश्रू जमिनीवर पडू लागले. त्यातूनच रुद्राक्ष वृक्षाची निर्मिती झाली व भोलेनाथ म्हणाले की या वृक्षाच्या फळामुळे तुमचे संरक्षण व कल्याण होईल.
रुद्राक्षाची ओळख किंवा परीक्षा
रुद्राक्ष पाण्यात टाकल्या टाकल्या तात्काळ तळ गाठतो. जर तो किडका, तुटलेला असेल तर तरंगतो किंवा अतिशय संथपणे तळ गाठतो. असा किडका, तुटलेला रुद्राक्ष धारण करू नये.
दोन तांब्यांची किंवा धातूंची नाणी घ्या त्यामध्ये रुद्राक्ष धरा. थोडा दाब द्या. खरा रुद्राक्ष हलकेच गोलाकार फिरतो म्हणजे Spin होतो, either clockwise or anticlockwise. ही रुद्राक्ष ओळखण्याची दुसरी परीक्षा.
रुद्राक्ष धारण क्रिया
रुद्राक्ष गळ्यात घालावा वा दंडावर बांधावा. जर रुद्राक्ष गुरु कडून प्राप्त झाला तर जास्त फलदायी ठरतो, इतकेच नाही तर रुद्राक्ष या शब्दाचा उच्चार सुद्धा फलदायक आहे. एक वेळा उच्चारलेला रुद्राक्ष हा शब्द दहा गोदानाचे फळ देतो असे शास्त्र सांगते.
रुद्राक्ष स्त्रीने धारण करू नये असा गैरसमज आहे. मान्यता अशी आहे की रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने मद्यप्राशन, मांसभक्षण, लसूण, कांदा यांचे भक्षण शक्यतो टाळावे. जर त्यांचा वापर होणार असेल तर रुद्राक्ष काढून श्रद्धापूर्वक पवित्र स्थानी ठेवावे व जेव्हा आपण सुचिर्भुत झालो आहोत हे आपले अंतर्मन सांगेल, तेव्हा परत परिधान करावा.
आपल्याकडून वरील निर्देशित खाद्यपदार्थांचा वापर झाला व त्यावेळी रुद्राक्ष परिधान अवस्था असेल किंवा आपण अयोग्य कृती वा कर्म केले आहे असे आपले मन सांगत असेल तर अशावेळी नारळाचे पाणी, दूध, दही, मध, तूप यांचे मिश्रण करून त्या मिश्रणात रुद्राक्ष भिजवून नंतर पुन्हा परिधान करावे. यास रुद्राक्ष शुद्धीकरण प्रयोग असे संबोधतात.
पुढील भागात विविध मुखी रुद्राक्ष, त्यांचा कशासाठी वापर, तसेच रुद्राक्ष या विषयावर चर्चा करूया.
तूर्तास इतकेच.

दत्तात्रय फणसे उपुक्त माहिती
ReplyDeleteThanks you
DeleteGood information
ReplyDeleteThanks you
Deleteउपयुक्त माहिती. लेख फार मोठा नसल्याने एका बैठकीत व आवडीने वाचला गेला.अशा विषयावरील लेख असेच असावेत असं माझं मत आहे.
ReplyDeleteThanks you
ReplyDelete