आठवणीतील गणपती

ह्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू झाला. जिथे तिथे झंजांचे नाद, उदबत्त्याचा आल्हाददायी सुगंध आणि "सुखकर्ता दुखहर्ता" चा गजर ऐकू येऊ लागला. प्रत्येक क्षण गजाननमय झाला. अशा या वातावरणात माझ्या स्मरणात आले काही आठवणीतले गणपती.


आठवणीतला पहिला गणपती हा ९0 च्या दशकातला होता. गणेश आगमनाची सुट्टी संपून माझी शाळा परत सुरू झाली होती. यावेळी शाळेमध्ये माझ्या अनेक मित्र मैत्रिणींकडून मी एका सार्वजनिक गणेश मंडळा च्या सजावटीची प्रशंसा ऐकली. Eco friendly decoration हा प्रकल्प त्यावर्षी नुकताच सुरू करण्यात आला होता. माझ्या मित्र-मैत्रिणींनी असे सांगितले की या मंडळातील सजावट अगदी साधी परंतु असाधारण आहे. मी ठरवले की शाळेतून परत जाताना या मंडळाच्या गणपतीचे दर्शन नक्की घ्यावे. बाप्पाच्या मंडपात प्रवेश घेतल्यानंतर लगेचच मला समजले की माझे मित्र मैत्रीण इथल्या सजावटीची एवढी प्रशंसा का करत होते. या मंडळाचे बहुतांश कार्यकर्ते हे जवळच भाजी विकत असत. या कार्यकर्त्यांनी सजावटीसाठी त्यांच्या साध्या वेताच्या टोपल्या वापरल्या होत्या. टोपली पालथी करून त्या टोपलीखाली विविध रंगांचे दिवे (electric bulb) लावण्यात आले होते. टोपल्यांच्या फटीतून हे प्रकाश किरण बापाच्या मूर्तीवर पडत होते. अतिशय साधी सजावट दैदीप्यमान होती. मला मंडळाची संकल्पना तर फारच आवडली पण या सजावटीचे साधेपण मनाला भावून गेले. यावरून मला नक्कीच जाणवले "Simplicity is the ultimate sophistication" ही म्हण किती योग्य आहे. आज फक्त एवढ्याच गोष्टीचे वाईट वाटते की या सजावटीचा एकही फोटो मी घेऊ शकले नाही.

आठवणीतला दुसरा गणपती आहे कोरम मॉल मधला. २0१८ च्या वर्षी इथे सजावट केली होती recycle केलेल्या मोबाईल आणि computer च्या मायक्रोचिप्स आणि इतर भागापासून. हे भाग वापरून त्यांनी गणपतीची प्रतिकृती केली होती. मला त्यांची कल्पना आणि सादरीकरण अत्यंत आवडले. आधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरा यांची उत्तम सांगड दिसून आली. तसेच "Best out of waste" ह्या संकल्पनेवर आधारित कलाकृती कौतुकास्पद वाटली. 'पूजेतल्या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा' हे तर आपण ऐकलेच होते, परंतु हे भाग्य निकामी मोबाईल आणि computer ना मिळावे हे विशेषच. 

आठवणीतला तिसरा गणपती २0२0 Lockdown चा आहे. जगात सगळीकडे भीतीचे सावट होते. जे दरवर्षी 'नक्की या, जेवायला या' असे आवर्जून सांगणारे, 'या वर्षी आम्ही घरीच छोटा उत्सव करत आहोत' असे सांकेतिक भाष्य करू लागले. त्यांचा विचार योग्य होता आणि कृतिसुद्धा. माझ्या मते त्यांनी social distancing कडे केवळ एक निर्बंध म्हणून न बघता त्याचे आचरण केले. ह्या वर्षी ज्या कुटुंबानी गणेशोत्सव साध्या प्रकारे आणि घरच्या घरी साजरा केला, मी त्यांना साष्टांग प्रणाम करते. 

आठवणीतला शेवटचा गणपती आहे गेल्या वर्षीचा. कोलबाड ह्या परिसरातील सार्वजनिक गणपतीची सजावट दरवर्षीच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद असते, पण गेल्या वर्षी (२0२५) ह्या मंडळाने केलेली विचारपूर्वक सजावट लक्षवेधी ठरली. ही सजावट एक सामाजिक चळवळ होती. सार्वजनिक मंडळाने सजावटीमध्ये "अवयव दान" (organ donation) ह्या बद्दल माहिती दिली. सजावटीमध्ये Hospital, operation theatre, organ transplant, अश्या आवश्यक विषयांवर पूरक माहिती दिली. प्रत्येक अवयव कसा दान केला जाऊ शकतो आणि गरजू व्यक्तीला तो कसा उपयोगी पडू शकतो याची माहिती small scale models वापरून समजविली होती. मला ही सामाजिक चळवळ उपयुक्त वाटली. काळाची गरज समजून जेव्हा एखादे मंडळ क्लिष्ट वैद्यकीय प्रकिया सोप्या शब्दात जनहितासाठी मांडते, ती सर्वात प्रामाणिक गणेश सेवा होते असे मला वाटते. 

मला खात्री आहे की पुढील वर्षांमध्ये अधिक सार्वजनिक मंडळे आलिशान सजावटी ऐवजी विचारपूर्वक सजावटीकडे वळतील. अर्थात ती बुद्धी त्यांना बुद्धिदाता विघ्नहर्ताच देईल 🙏🏻

Comments